मुंबई - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशासाठीच्या प्रवेश प्रक्रियेला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या पालकांना आत्तापर्यंत आपल्या मुलांसाठी आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता आला नाही, त्यांना या मुदतवाढीचा मोठा लाभ मिळणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी राज्यात आतापर्यंत राज्यभरातून २ लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले असले तरी अनेक पालकांना अर्ज करता आले नाही. त्यामुळे ३० मार्चपर्यंत पुन्हा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.राज्यभरात ५ मार्चपासून आरटीईसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील एकूण ९ हजार १९४ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ७८२ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या जागांसाठी राज्यभरातून आतापर्यंत २ लाख ९२५ अर्ज आले आहे. मोबाईल अॅपद्वारे खूप कमी प्रमाणात अर्ज आले आहे. पालकांच्यावतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे अधिकाऱ्यांच्यावतीने तपासण्यात येणार आहे. सोडतीमध्ये निवडण्यात आलेल्या अर्जाचे प्रवेश पालकांनी निवडलेल्या शाळांपैकी एकामध्ये होणार आहे.
गेल्यावर्षी अनेक लॉटरी जाहीर करुनदेखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे शाळा मालक आणि सरकारमध्ये निधीवरून वाद निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश घ्यावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षांत आरटीईचे प्रवेश हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.