मुंबई - ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमांचे चित्रीकरण करू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेत या धमकीचा आम्ही तीव्र विरोध करत असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने या अभिनेत्यांच्या सिनेमांचे चित्रीकरण थांबविण्याचा प्रयत्न केला, तर रिपब्लिकन पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या सिने कलाकारांचे संरक्षण करेल; तसेच त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बाधा आणणाऱ्यांना रोखण्याचे कामदेखील रिपब्लिकन पक्षाच्यावतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहे पूर्ण प्रकरण-
काँग्रेस सत्तेत मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे सतत ट्विटरवर त्यांच्याविरोधात लिहित होते. मात्र, आता पेट्रोले दर १०० रुपयांच्या जवळ गेले तरीही त्यावेळी सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच महाराष्ट्रात त्यांच्या सिनेमा आणि चित्रीकरणावर बंदी आणणार असल्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने पटोले यांनी दिला होता.
आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील-
सेलिब्रिटी सिने अभिनेते हे पेट्रोल दरवाढी वरून केंद्र सरकारवर टीका करीत नाहीत, असा आरोप करून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नसल्याची धमकी दिली आहे. मात्र, अशी धमकी देणे चुकीची आहे. नाना पटोले आमचे चांगले मित्र आहेत. हिंदी मराठी चित्रपट सृष्टी ही मुंबईची शान आहे. सिने उद्योग हा मुंबईतील महत्वाचा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगात अशी बाधा आणणे योग्य नाही. लोकशाहीत अशी धमकी देणे चुकीचे आहे. तसेच काँग्रेस पक्षाने या अभिनेत्यांचा विरोध करताना त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरण बंद पडण्याचा प्रयत्न केला तर वेळ पडली तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करतील. याचबरोबर कंगना प्रमाणे महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल, असेही आठवले यांनी जाहीर केले आहे.
या आधी कंगनालाही दिले होते संरक्षण-
मी मुंबईत 9 सप्टेंबरला येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं मागील वर्षी दिले होते. कंगना रणौतने मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यात कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तिला मुंबई व महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले होते. पण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कंगनाची त्यावेळी पाठराखण केली होती. त्यांचा आरपीआय पक्षाने तिला संरक्षण देखील दिले होते.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून सिनेअभिनेत्यांवर निशाणा साधल्यानंतर विरोध आक्रमक झाले आहेत, तर सत्तेत असलेल्या सेना राष्ट्रवादी पक्षाकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
हा पब्लिसिटी स्टंट - फडणवीस
अभिनेत्यावर टीका करून दिवसभर चर्चेत राहणे सोपे असते. म्हणून नानाकडून हा पब्लिसिटी स्टंट करण्यात आला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नसल्याचे म्हटले आहे.
..तर त्याला आमचा पाठिंबा - खासदार सावंत
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोलेंच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले. त्यांची ही वैयक्तिक प्रतिक्रिया आहे. जर नाना शिवसेनेसारखे आक्रमक झाले असतील तर त्याला आमचा पाठिंबा आहे. पेट्रोलच्या दरवाढीवर हे अभिनेते गप्प का ? हा प्रश्न तर आहे! त्यावर अभिनेते बोलून कधी बोलणार हादेखील एक प्रश्न आहे, असे अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नाही - राम कदम
भाजपचे आमदार राम कदम यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नाही, काँग्रेसने ध्यानात ठेवावे. देशाच्या हितासाठी जेव्हा कुणी काही बोलेल त्यांच्या पाठिशी महाराष्ट्र मागे उभा राहिल, असेही कदम यांनी म्हटले.
सोनिया गांधींनी माफी मागावी- अनिल वीज
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची माफी मागावी, अशी मागणी अनिल विज यांनी केली.विरोधी पक्षांची अर्थपूर्ण भूमिका निभावण्यात अक्षम असणारे नेते आता चित्रपटातील कलाकारांनाही लक्ष्य करीत आहेत. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या देशातील प्रतिष्ठित लोकांना धमकी देत आहेत. काँग्रेसच्या अंपगत्वाचे आणि पोकळपणाचे हे सूचक आहे, असे अनिल विज यांनी टि्वट करून म्हटलं. तसेच त्यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.