मुंबई - चौथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात दक्षिण भारतीय लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण भारतीय मतदारांना या निवडणुकीबद्दल काय वाटते हे 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
या सरकारने जी आश्वासने दिली होती त्यावर अंलबजावणी केली नाही. फक्त मागील सरकारच्या चुका दाखवण्याचेच काम केले, असे मत धारावीतील नागरिकांनी व्यक्त केले. तसेच, लोकप्रतिनधींनी येथील समस्यांकडे लक्ष द्यावे. पाणी, नालेसफाई यांचे नियोजन करावे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. आतापर्यंतच्या प्रचारात पुलवामा हल्ला ते पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकपर्यंतचे विषय बोलले गेले. पण या विषयावर बोलणारे आणि आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत गप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील पाण्याची समस्या, इतर समस्यावर राजकीय नेते काहीही बोलत नाहीत. लोकांना काय समस्या आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ज्या विषयांचा नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी काहीही संबंध नाही त्या विषयावर बोलत राहतात, अशा तक्रारी नागिरकांनी केल्या. धारावी, कोळीवाडा, अंटोफील यासारख्या दक्षिण भारतीय वस्तीतील नागरिकांनी आपल्या समस्या 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीला बोलून दाखवल्या.