मुंबई - जगप्रसिद्ध हापूस आंब्याची गोडी सातासमुद्रापार पोहोचली आहे. चांगला दर आणि चांगली गुणवत्ता यामुळे हापूस आंब्याला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रत्नागिरीच्या हापूस निर्यात सुविधा केंद्रातून ३० टन हापूस आंबा लंडन अमेरिका कॅनडा आणि दुबईला रवाना झाला आहे.
हापूस आंब्याचा रंग, त्याचा स्वाद यामुळे देश विदेशातील नागरिकांकडून हापूस आंब्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या बागेतील सेंद्रिय आंबा विदेशात पाठवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी रत्नागिरी येथील हापूस निर्यात सुविधा केंद्र शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करत आहे.
रत्नागिरी येथील हापूस निर्यात सुविधा केंद्रातून सानप नर्सरी प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक यांच्याकडून रत्नागिरी ते दुबई ५ टन हापूस आंबा रवाना करण्यात आला आहे. हापूस आंबा, पावस, लांजा, रत्नागिरी, शिरगाव आणि राजापूर येथील शेतकऱ्यांनी दिला होता. आजपर्यंत निर्यात झालेला हापूस आंबा हा तोषिब काजी, शिवराज नेवरेकर मुकादम, महेश आंब्रे, हुसेन आग्रे, प्रदीप आंब्रे, नागपाल अनिकेत हर्षे या शेतकऱ्यांच्या भागातील पाठवण्यात आला आहे.
हे आंबे पाठवण्यासाठी पणन उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, सहाय्यक पणन अधिकारी गणेश पाटील, सह सहाय्यक पणन अधिकारी मिलिंद जोशी, सदगुरु इंटरप्राईजेसचे पॅक हाऊस मॅनेजर विश्व पाल मोरे यांचे मोठे योगदान लाभले. यावेळी बारामती येथील शेतकरी जीवन सोनवणे यांनी बोलताना सांगितले, की 'फळांचा राजा हापूस आंब्यांचा स्वाद विदेशातील नागरिकांना चाखता यावा, हाच उद्देश या निर्यातीमागे आहे. तेजोमय घाडगे, तेज ग्रो इन इंडिया आणि जितेंद्र नेमाडे, तुषार वाबळे या शेतकऱ्यांच्या संयोगाने ही निर्यात शक्य झाली.