मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात धक्कादायक खुलासे केले आहेत. मीडिया टायकून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांच्यासह मुंबई पोलीस खात्यातील एटीएस प्रमुख देवेन भारती यांच्यावर सुद्धा या पुस्तकातून प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
मारिया यांच्या पुस्तकात त्यांनी बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात मुंबई पोलीस आयुक्तपदावर असताना तपासाच्या दरम्यान त्यांना अचानक आयुक्त पदावरून हटविल्याच्या मुद्द्यावर मौन सोडले आहे. शीना बोरा हत्याकांडाच्या वेळी मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचे राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. शीना बोरा हत्याकांड तपासाच्या दरम्यान पीटर मुखर्जीला वाचविण्याचा माझ्यावरील आरोप बिनबुडाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'जीएसटी भवन आगीची एसआयटी चौकशी करा; दहाव्या मजल्याची माहिती लोकांसमोर समोर आणा'
2015 सालाच्या शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला तत्कालीन आयुक्त देवेन भारती हे वैयक्तिक ओळखत होते. मात्र, ही बाब तपासाच्या दरम्यान देवेन भारती यांनी मला सांगितली नसल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केला आहे. राकेश मारिया यांनी तपासादरम्यान पीटर मुखर्जीला प्रश्न केला होता की, 2012 मध्ये शीना बोरा अचानक बेपत्ता झाली होती, तर या बद्दल कोणाला काहीच का नाही सांगितले? यावर उत्तर देताना पीटर मुखर्जी याने या बद्दल मी देवेन भारतींना सांगितल्याचे पीटर मुखर्जीने म्हटले होते.
हेही वाचा - 'कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार'
राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात शीना बोरा हत्याकांडात तपास करीत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना माझ्याबद्दल कोणीतरी चुकीची माहिती देत होते, असा आरोप केला आहे. शीना बोरा हत्याकांडात मी पीटर मुखर्जीला आरोपी म्हणून दाखवत असताना मला हटविण्यासाठी प्रमोशन देऊन आयुक्त पदावरून हटविण्यात आल्याचा आरोप राकेश मारिया यांनी केला आहे.