मुंबई Western Railway Line : पश्चिम रेल्वेच्या साडेआठ किलोमीटर लांबीच्या अतिरिक्त सहाव्या मार्गिकेसाठी 27 ऑक्टोबरपासून नॉन इंटरलॉकिंग कार्य सुरू करण्यात आलंय. हे काम 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळं अडीच हजारांपेक्षा अधिक रेल्वे फेऱ्या रद्द होणार असल्याचं रेल्वे विभागानं कळवलं होतं. मात्र, शुक्रवारी 200 लोकल सेवा रद्द झाल्यानं पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली. यामुळं प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, यावरुन रेल्वे प्रवासी संघटनेचे अमोल पाटील यांनी ढिसाळ नियोजन म्हणत रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केलीये.
प्रवासी काय म्हणतात : बोरीवली येथून रोज प्रवास करणारे बिपीन शाह यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. रेल्वे प्रशासनानं या संदर्भातील माहिती 15 दिवसांपूर्वी जनतेला द्यायला हवी होती. काही पर्यायी लोकल मध्य रेल्वेच्या दिशेनं सोडून ठाण्यात बस सेवा अतिरिक्त सुरू केली असती तर चर्चगेट ते दादर आणि नंतर दादर ते ठाणे प्रवास केला असता. ठाण्याला उतरून बसने प्रवास देखील होऊ शकला असता, असं ते म्हणाले.
कोणत्या आणि किती ट्रेन रद्द होणार : 26 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत रेल्वेच्या 2,525 सेवा रद्द होणार आहेत. त्या डाऊन आणि अप या दोन्ही दिशेला असणार आहेत. 27 ऑक्टोबरला 256 तर तर त्याच्या पुढच्या दिवसापासून रोज 230 आणि 300 पेक्षा अधिक सेवा रद्द होणार आहेत. तर 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर रोजी 93 सेवा आणि 110 रेल्वेच्या सेवा रद्द होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय.
रेल्वे प्रशासनाची भूमिका : यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सोयी-सुविधा निर्माण करणं हे काम गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या सहाव्या मार्गिकेमुळे अधिक लाभदायक होणार आहे. नॉन इंटरलॉकिंग काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात एकूण अडीच हजारांपेक्षा अधिक रेल्वे सेवा रद्द केल्या जाणार आहेत. या इंटरलॉकिंग सिस्टीममुळं भविष्यात अतिरिक्त ट्रेन धावण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं प्रवाशांची तात्पुरती गैरसोय होणार आहे. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
रेल्वे प्रवासी संघटनेची टीका : रेल्वे प्रवासी संघटनेचे अमोल पाटील म्हणाले की, एक तर केवळ 4 दिवसांपूर्वी याबाबत सूचना दिली गेली. मात्र, 10 दिवस अगोदर जनतेला सांगायला हवं होतं. तसंच पर्यायी प्रवास सेवेचं नियोजन रेल्वं प्रशासनानं करायला हवं होतं. त्यामुळं बोरीवली, मालाड, अंधेरी, दादर, वांद्रे विरार ,गोरेगाव, सांताक्रूझ, जोगेश्वरी येथे प्रचंड गर्दी होत असून याचा प्रवाशांना त्रास होतोय. रेल्वे प्रशासन नियोजन करण्यात अपयशी ठरली आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -