मुंबई - आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्याच्या जनतेशी संवाद साधताना लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल आहे, असे व्यक्तव्य केले होते. यावरूनच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. आरोग्यमंत्र्यांनी यापुढे केंद्र सरकार महाराष्ट्राला लस देत नाही, असा आरोप करू नये, अशी विनंती केली आहे. तसेच लसीकरणाची मोहीम राज्यामध्ये योग्य पद्धतीने राबवावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार ताबडतोब द्यावे -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डॉकटर, नर्स यांची रिक्तपदे भरण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार प्रशासकीय गोंधळामुळे देता आले नाही, ते सरकारने ताबडतोब द्यावे. सर्वात जास्त लसीकरण आपल्या राज्यात होत आहे, हे आपण सांगतो त्यामुळे लसीकरण केंद्रावर कोणताच गोधळ निर्माण होणार नाही, याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
अजित पवारांना दिला खोचक टोला -
केंद्र सरकारने इतर देशांना लस का दिली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यालाही दरेकरांनी प्रत्यूत्तर दिले. अजित पवार यांचा हे वक्तव्य म्हणजे एका स्वतंत्र आयलँडवर राहणाऱ्या व्यक्तीचे वक्तव्य असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला. लस परदेशात पाठवली म्हणून आज भारताला इतर देशांकडून मदत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सरकारने कोरोना काळात अनावश्यक खर्च टाळला पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.