मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना चोप देताना दिसत आहेत. मात्र, काही ठिकाणी पोलीस अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना देखील बेदम मारहाण करत असल्याचे समोर आले. घाटकोपरच्या असल्फा भाजी मार्केटमध्ये भाजी विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला घाटकोपर पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही मारहाण पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाजी विक्रेता भाजी विक्री करत होता. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्याची भाजी रस्त्यावर ओतून दिली. त्यानंतर त्याला काठी आणि बुटाने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता एका पोलिसाने रस्त्यावरील लादी उचलून त्याच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला पकडल्याने या भाजी विक्रेत्याचा जीव वाचला.
या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. भाजी ही अत्यावश्यक बाब आहे. भाजी विक्रेत्यांनी भाजी विकली नाही तर नागरिक खाणार काय, असा सवाल नागरिक करत आहेत. पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत मात्र, त्यांनी अमानुष मारहाण करणे थांबवले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.