मुंबई - असे म्हणतात की, कविता ही समाजमानाचा आरसा असते. सामाजिक परिस्थिती परखडपणे मांडण्याची ताकत कवितेमध्ये असते. कवयित्री रेश्मा कारखानीस यांनी सध्या राज्यातील चालू असलेल्या सरकार स्थापनेतील विविध पक्षाच्या रस्सीखेचमधील चर्चेवर एक कविता प्रसिद्ध केली आहे. या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने सत्तेची गादी मिळवण्याठी पक्षाची धडपड आणि नेत्यांची एकदुसऱ्यावर आगपाखड याचे उदाहरण मांडले आहे.
बोल फुकाचे निव्वळ चर्चा, बंद करा त्या पोकळ चर्चा
फक्त बांधले हवेत इमले, मुळात होत्या फुटकळ चर्चा...
बिया पेरल्यास संकरित पण, उगवत गेल्या निष्फळ चर्चा
भूक कशी भागेल कोणाची, ताट रिकामे केवळ चर्चा
पोट रिते फासावर जाते, सभेत करती चंगळ चर्चा...
विचार विनिमय फक्त दिखावा, अविचारांची अडगळ चर्चा
मरणोत्तर ही न्याय मिळेना, करती टंगळमंगळ चर्चा
धुमसत असतो आत निखारा, वरवर फसवे काजळ चर्चा...
कोण विषारी शब्द फुंकते, क्षणात होती वादळ चर्चा
अजून कोठे मिटली दंगल, अजून करते वळवळ चर्चा
चला करूया आपण सुद्धा, चर्चांवरती अंमळ चर्चा...
चर्चा! चर्चा! निव्वळ चर्चा...
या कवितेच्या माध्यमातून कवयित्री रेश्मा कारखानीस यांनी सर्वच पक्ष केवळ हवेत चर्चा करतात. या चर्चेतून काही निष्पन्न होणार नसून खरोखरच सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी हेच राजकीय पक्ष कशी चर्चा करून वेळ पुढे घेऊन जातात हे भाष्य केले आहे.
हेही वाचा - दारूच्या नशेत चार वाहनांना धडक, दोघेजण पंत नगर पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा - शिवसेनेचे शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट