मुंबई - आघाडीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले. मात्र, आमचे सरकार आल्यापासून मुंबई सुरक्षीत असल्याचे पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे भाजप आणि शिवसेना यांच्या संयुक्त प्रचारसभेत पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (शनिवारी) संपत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे -
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कसे आहात मुंबईकर, या मराठी वाक्याने भाषणाला सुरुवात केली.
- उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'माझे लहान भाऊ' असा केला.
- लोकसभेपेक्षा विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा उत्साह आहे. मुंबई मोठी नगरी आणि आर्थिक राजधानी आहे . देशाला पुढे नेणारी लोकं मुंबईत राहतात. सर्वांना मुंबईत यावेसे वाटते. मुंबईला शक्तिशाली करण्याचं काम फडणवसीस सरकारनं केलं.
- आघाडीच्या काळात शहराच्या पायाभुत सुविधांऐवजी मंत्रालय सक्षम करण्याचा प्रयत्न होत असायचा. खुर्चा वाचवण्याच्या स्पर्धेत ५ वर्षे जात होती. आम्ही भरोशाचं सरकार दिलं. सैनिकांनाही विरोधकांनी सोडलं नाही.
देवेंद्र फडणवीस भाषणातील मुद्दे -
- निवडणुक तीन दिवसावर आली आहे. राज्यात कोणत्याही व्यक्तीला विचारा तो सांगेल महायुतीचं सरकार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. पाच वर्षे विरोधकांना चारीमुंड्या चीत केलं. पवार नखं कापून प्रदर्शन करत आहेत. ईडीच्या नावनं अनुकंपावर मतं मागत आहेत.
- मुंबईतील विकासकामं पुढं नेली. मुंबईची विकासकामांना मोदींनी चालना दिली. मुंबई देशातले सर्वोत्तम महानगर करणार. मुंबईतील सर्व गरीबांना घर देणार आहे. नव्या मुंबईसाठी आधुनिक सेवासुविधा उभारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. १ कोटी रोजगार आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचाय. तुमचा आशिर्वाद आमचा जनादेश आहे.
उध्दव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे -
- आपण लोकसभेला आशिर्वाद मागितले. विधानसभेलाही मुंबई आशिर्वाद देणार आहे. पावसामुंळं आजच्या सभेवर सावट होतं. माझ्या दोन सभा रद्द झाल्या. विरोधक खाऊन-खाऊन थकले आहेत.
- काँग्रेसचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान होते. त्याकाळात काँग्रेसच्या नेत्यांपुढे मान आदरानं झुकायची. आता शरमेनं मान खाली झुकते. काँग्रेस सत्ताभक्षक झाले होते. महायुतीपुढं विरोधकांचे आव्हान नाही. लोकांच्या समस्यांचं आव्हान आहे. महायुतीच्या सरकारमधे शिवसेनेचं योगदान विसरता कामा नये.
- १० रुपयात थाळी देणार. १ रुपयात आरोग्य चाचणी देणार. भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकर आणि महात्मा फुल्यांना भारतरत्न देण्याची गोष्ट आवडली. राहुल गांधी सावरकरांना पळकुटं म्हणतात. पराभवानंतर राहुल गांधीच पळाले. याच महीन्यात अयोध्या आणि राममंदीराची दिवाळी साजरी करणार आहे.