मुंबई - महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. दरवर्षी ही स्थळे लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेली असतात. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात शासनाने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी धार्मिक स्थळांच्या प्रशासनांकडून होत आहे.
लॉकडाऊनला पाच महिने उलटले असून अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी अनेक ट्रस्ट व पक्षांकडून जोरदारपणे पुढे येऊ लागली आहे. काल(सोमवार) जुम्मा मस्जिद ट्रस्टने मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना पत्र देऊन मस्जिद उघडण्याची मागणी केली. तसेच वडाळा येथील पारशी अग्यारी उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अग्यारी प्रशासनाने पत्र लिहले आहे. सायन कोळीवाडा येथील गुरुद्वारा ट्रस्टने व सेंट मेरी चर्च ट्रस्टने देखील धार्मिक स्थळे उघडी करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई भाजपकडूनदेखील राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिरे बंद आहेत. मात्र, आता मंदिरात योग्य ती खबरदारी घेत मंदिर सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मंदिरांचे पुजारी करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक मानसिक दडपणात आहेत. धार्मिक स्थळांवर आल्यानंतर मन:शांती मिळते. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सायन मुरली मंदिर पुजारी मनोहर जोशी यांनी दिली.
कालच त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी हे आपल्या जिल्ह्यातील मंदिरे सुरू व्हावीत, ही मागणी घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. वेगवेगळ्या समाजातील लोक आहेत त्यांच्या देखील याच भावना आहेत. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर मंदिरे उघडण्यापूर्वी, उघडल्यानंतर आणि कोविडचे संकट टळेपर्यंत कोणती खबरदारी मंदिरात घ्यायची आहे, यासंबंधी मंदिर व्यवस्थापनांनी पुस्तिका तयार केल्या आहेत. या पुस्तिका मंदिर प्रशासनाने राज्य सरकारकडे देखील पोहोच केल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे या ठिकाणांवर अवलंबून असलेले व्यवसाय देखील ठप्प आहेत. त्यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे फुल विक्रेते, अगरबत्तीवाले व इतर मंदिर साहित्य विक्री करणारेदेखील मंदिरे उघडी करण्याची मागणी करत आहेत. वारंवार या होणाऱ्या मागण्या पाहता आता मंदिरे कधीपासून सुरू होत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.