मुंबई - राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परिक्षेत मुंबई महापालिका शाळांमधील इयत्ता ५ वी आणि ८ वीचे २३९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून दरवर्षी इयत्ता पाचवीच्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येते. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालानुसार इयत्ता पाचवीचे १७० तर इयत्ता आठवीचे ६९ असे एकूण २३९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
या परिक्षेत मुंबईचा इयत्ता पाचवीचा निकाल २१.८२ टक्के तर आठवीचा निकाल ३०.११ टक्के लागला आहे. यात पालिका शाळेचा पाचवीचा निकाल १०.११ टक्के तर आठवीचा निकाल १३.०५ टक्के लागल्याची माहिती नाईक यांनी दिली.
उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ -
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परिक्षेत इयत्ता पाचवीचे २०१७ मध्ये ७४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. २०१८ मध्ये या संख्येत वाढ झाली होऊन १७९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तर २०१९ मध्ये १७० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. इयत्ता आठवीचे २०१७ मध्ये १९, २०१८ मध्ये ३० तर २०१९ मध्ये ६९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
सराव परिक्षांवर भर -
यंदा पालिका शाळांमधील इयत्ता दहावीचा निकाल २० टक्क्यांनी घसरला आहे. हा टक्का सुधारण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरपासून सराव परिक्षा घेतल्या जाणार आहेत. या परिक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी गूण मिळतील त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच बोर्डाच्या परिक्षेची भिती वाटू नये म्हणून सराव परिक्षा बोर्डाच्या धर्तीवर घेतली जाणार आहे. तर इतर शाळांमधील शिक्षकांडून पेपर तपासले जाणार आहेत. शिक्षकांना काही विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शिकवण्याचे आवाहन केले जाणार आहे, अशी माहिती अंजली नाईक यांनी दिली आहे.