मुंबई - दहीहंडीची वाट वर्षभर आतुरतेने पाहिली जाते. दहीहंडी पथकासहित राज्यातील सामान्य नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करू नये, असे निर्देश सरकारने दिले आहेत. यामुळे मुंबईसह उपनगरात असणाऱ्या चारशेहून अधिक गोविंदा पथकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, राज्य सरकारने निर्देश देऊनही भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दहीहंडीचे आयोजन केले जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.
घाटकोपरच्या दहीहंडीचे आयोजक आणि भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. तर दहीहंडीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भगवती मैदानामध्ये दहीहंडीच्या आयोजनाची तयारीदेखील केली आहे. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे चित्र पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या दहीहंडीच्या आयोजनानंतर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यानंतरही दहीहंडीचे आयोजन केले जाईल, असे संकेत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून देण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवात करोडोंची उलाढाल -
मुंबईत ४००हून अधिक निंदणी असलेलं मंडळे मिळून ४० हजारच्या आसपास गोविंदा आहेत. या प्रत्येकावर दहिकाल्याच्या दिवशी ६०० रुपयांच्या आसपास खर्च होतो. इनामासाठी दहा कोटीहून अधिक रक्कम लावली जाते. दहीहंडीच्या दिवशी ५०० हून अधिक हंड्या विकल्या जातात. मुंबईत दहीहंड्या उत्सवात मोठमोठे आयोजक सहभागी होतात. त्यामुळे मोठी बाजारपेठही तयार झाली आहे. यात राजकीय नेते मंडळी दहीहंडी उत्सव साजरे करत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून दहीहंडीचे आयोजन करण्याचा प्रयत्न असतो.
दहीहंडी उत्सव साजरा करू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
23 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोविंदा पथकांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीदरम्यान राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व गोविंदा पथकांना केले. त्यानंतर अनेक गोविंदा पथकांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, या बैठकीनंतरही काही गोविंदा पथकाने निर्बंध तसेच अटी शर्ती घालून गोविंदा उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती.
उत्सव साजरे करत असताना तिसरा लाटेचा धोका -
राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच राज्यामध्ये असलेले सण आणि उत्सव पाहता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यतादेखील राज्य सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. सण आणि उत्सव साजरे करत असताना तिसरा लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे पत्र केंद्रीय स्वास्थ्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी देखील राज्य सरकारला पाठवले आहे. तसेच कर्नाटकमध्ये पोनम उत्सवामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध कडक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.