मुंबई - हिवाळी अधिवेशनच्या निमित्ताने खासगीकरणाला विरोध करत उमेद अभियानातील कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
प्रामुख्याने राज्य शासनाने संपत्या वर्षात उमेद अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित केल्या. तसेच अन्य संस्थेकडे हे अभियान सोपवण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची नवीन संस्थेत पुर्ननियुक्ती करण्याचे ठरवले. परंतु, प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती तर झालीच नाही व हे कर्मचारी सेवा बंद झाल्याने उघड्यावर आले. या अभियानाच्या बाबतीत शासनाने धरसोढीचे धोरण हाती घेतल्याने त्यास जोडलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंबातील महिला बचतगट संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण अभियान कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या अभियानातील सर्व कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन
आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. आंदोलनासाठी बसलेल्या 'उमेद'च्या महिलांची भेट घेताना अब्दुल सत्तार यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले की, उद्या संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेट मंत्री आणि सचिवांसोबत बसून उमेदच्या प्रमुख लोकांसोबत बसून मागण्या मान्य करून घेण्यासंदर्भात बैठक घेऊ. आज रात्री उशिररापर्यंत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन देत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी महिलांना सांगितले. पण, आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा महिलांनी निर्धार केला आहे.