मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कोरोना संक्रमणाचा विळखा राज्य पोलीस दलात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य पोलीस दलात मुंबई येथील एका पोलिसाचा मागील 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या पोलिसांचा आकडा 49वर गेला आहे.
राज्यातील विविध रुग्णालयांत अजूनही कोरोनाबधित 1 हजार 34 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 118 पोलीस अधिकारी तर, 916 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात 2 पोलीस अधिकारी व 48 पोलीस कर्मचारी अशा 49 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
टाळेबंदीच्या काळात राज्यभरात कलम 188नुसार तब्बल 1 लाख 34 हजार 412 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्या 740 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 279 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 858 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल 1 लाख 4 हजार 351 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले असून अवैध वाहतुकीच्या 1 हजार 335 प्रकरणात 27 हजार 481 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 84 हजार 161 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 8 कोटी 64 लाख 19 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 52 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत. राज्यात सध्या एकूण 109 रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास 3 हजार 548 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्वाधिक मृत्यू मुंबई पोलीस खात्यात
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील 33 पोलीस कर्मचारी व 1 अधिकारी अशा एकूण 34 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल पुणे पोलीस विभागातील 3, सोलापूर शहर पोलीस खात्यातील 2, नाशिक ग्रामीण पोलीस खात्यातील 3, दहशतवादविरोधी पथकमधील 1 पोलीस कर्मचारी, मुंबई रेल्वे पोलीस दलातील 2, ठाणे ग्रामीण पोलीस दलातील 2, जळगाव ग्रामीण पोलीस दलातील 1, पालघर पोलीस खात्यातील 1 अशा एकूण 49 पोलिसांचा समावेश आहे.
हेही वाचा - शिवसेना भवन सील, ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोना