मुंबई : मुंबईमध्ये धुलीवंदन साजरे करण्यासाठी चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. धुलीवंदन साजरे केल्यावर अनेक जण समुद्रात पोहायला जातात. अशाच पैकी एक व्यक्ती सायंकाळी ५.३० च्या सुमारास जुहू चौपाटीवर समुद्रात गेला. तो खोल पाण्यात गेल्यामुळे पाण्यात बुडाला. लाईफ गार्ड यांनी या व्यक्तीला बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रवींद्र चंद्रकांत पंगारे वय ३० वर्षे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रंग बाधेने ७ जण जखमी : मुंबईतील विविध भागांमध्ये धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळताना सातजण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकजण किरकोळ भाजला गेला आहे, तर उर्वरित सहा जणांच्या हाता पायाला किरकोळ मार लागला आहे. सातपैकी दोन जणांवर मुंबईच्या नायर रुग्णालयात तर पाच जणांवर जे जे रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नायर रुग्णालयातील दोन किरकोळ जखमी वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद झाली नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जे जे रुग्णालयामध्ये पाच जणांवर उपचार करण्यात आले, त्यातील एकजण किरकोळ भाजला होता. तर, अन्य चार जणांच्या हातापायाला किरकोळ मार लागल्याची माहिती जे जे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
अन्नबाधेने ७ विद्यार्थी रुग्णालयात : ताडदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल शाळेमधील ७ विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा झाली आहे. ७ पैकी ५ विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला आहे, तर दोन विद्यार्थ्यांना ताप आला आहे. पाच मुले १२ वर्षावरील तर दोन मुले १२ वर्षाखालील आहेत. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अंकित राऊत १५ वर्षे, कल्पेश पवार ११ वर्ष, सुमित सरकार ११ वर्ष, सोमनाथ मुडकट १४ वर्ष, अक्षय मोनीस्वारे १४ वर्ष, शदाफ कुरेशी १७ वर्ष, परमेश्वर द्मागणे १८ वर्षे अशी अन्न बाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
बाल्कनी कोसळून ४ जण जखमी : मुलुंड पश्चिम रामगड नगर, गोशाला रोड, नेपाळी चाळ येथील घराची बाल्कनी दुपारी अडीचच्या सुमारास कोसळली आहे. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले आहेत. अनुष्का देवी अडीच वर्ष, श्रीकांत कचरे २९ वर्ष, यमुना कुमारी ४ वर्ष, मुकेश परियार ५ वर्ष या चारही जणांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चारही जणांवर उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : Bhasm Holi: काशी विश्वनाथाच्या दरबारात भक्तांनी खेळली भस्म होळी, पहा विलोभनीय दृश्य