मुंबई - कोरोना रुग्ण वाढल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मे महिन्यामध्ये 209 परिचारिकांची (नर्सेस) भरती केली होती. त्यानुसार या नर्स मेपासून विविध कोविड सेंटरमध्ये जीवाची बाजी लावत सेवा देत आहेत. पण, त्यांना गेल्या अडीच महिन्यात एक रुपयाही मिळालेला नाही. त्यांचा पगार आणि इतर भत्त्यापोटी एक दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे या नर्सेस आर्थिक अडचणीत आल्या असल्याने त्यांनी त्वरित पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पालिकेच्या स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 209 नर्सेसची नियुक्ती मे महिन्यामध्ये करण्यात आली. बिंदूनामावलीचा विचार न करता ही नियुक्ती करण्यात आली, तर या नर्सेसला 50 ते 52 हजार रुपये पगार आणि दिवसाला 300 रुपये भत्ता निश्चित करण्यात आला. त्यानुसार काही नर्सेस बीकेसी कोविड सेंटर, काही नेस्को, तर काही इतर ठिकाणी काम करत आहेत. पण आज जुलै महिना संपत आला तरी त्यांना पगाराचा आणि भत्त्याचा एक रुपयाही मिळालेला नाही, असा आरोप म्युन्सिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी केला आहे.
पालिकेत नियुक्ती होण्याआधी या नर्सेस विविध खासगी रुग्णालयात काम करत होत्या. त्यानुसार या नर्सेसना ज्या दिवशी नियुक्ती दिली त्याच दिवशी कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तेव्हा अनेक नर्सेसना आपला करार(बॉन्ड) रद्द करत आर्थिक नुकसान सहन करत तत्काळ रुजू व्हावे लागले, तर एका महिन्याचा पगारही मिळाला नाही. इतके करूनदेखील या नर्सेस कामावर रुजू झाल्या. पण मेपासून आजपर्यंत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला, हक्काचे वेतन मिळालेले नाही, असेही नारकर यांनी सांगितले आहे. या नर्सेसना त्वरित पगार आणि भत्ता द्यावा, अशी मागणी युनियनकडून एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याला दोन दिवस झाले तरी यावर ठोस कारवाई अजून झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आता मुंबईत रुग्ण कमी होत असल्याने आता क्वारंटाइन सेंटर, कोविड सेंटर बंद करत मनुष्यबळ कमी करण्यात येत आहे. त्यामुळे आता या 209 नर्सेसमध्येही भीती निर्माण झाल्याची माहिती नारकर यांनी दिली आहे. तेव्हा या नर्सेसच्या बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण करत त्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घ्यावे अशीही युनियनची मागणी आहे. याविषयी पालिकेच्या आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.