मुंबई- कॊरोनापासून बचाव करण्यासाठी घरात राहणे, हाच एकमेव रामबाण उपाय आहे. सरकार, पालिका, पोलीस हेच जिवाच्या आकांताने नागरिकांना सांगत आहेत. पण अनेक मुंबईकर काही केल्या हे समजायला तयार नाहीत. त्यामुळे कॊरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे आता जीवाची बाजी लावत कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयातील जिगरबाज नर्सेसलाच समोर यावे लागले आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील कॊरोना वॉर्डमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या नर्सेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी मुंबईकरांना कळकळीची विनंती करत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनातून त्या कशा परिस्थिती काम करत आहेत आणि या आजाराची दाहकता किती आहे हे समजते. वासंती जाधव (प्राजक्ता चव्हाण) आणि शलाका या दोन नर्सेसचा हा व्हिडिओ आहे. कॊरोना वॉर्डमध्ये जाताना आपण हृदयावर दगड ठेवून आत जातो. आम्ही रुग्णाला कशी सेवा देतो, आम्हाला किती टेंशन असते हे आम्हालाच माहित असे म्हणत, गरज असेल तरच बाहेर पडा, असेही त्या या व्हिडिओत सांगत आहेत. घरातच रहा, असे सांगतानाच भाजी-दुधाची पिशवी आणल्यानंतर त्या कशा स्वच्छ करायच्या आणि इतर स्वच्छता कशी राखायची, हे या नर्स सांगताना दिसतात.