मुंबई : मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदा मुंबईत पावसाळा लांबला आहे. यामुळे पावसाळी आजाराचे रुग्ण ऑक्टोबर महिन्यातही वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पहिल्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान मलेरिया, डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
रुग्णसंख्येत वाढ : मुंबईमध्ये १ ते ९ ऑक्टोबरपर्यंत ९ दिवसात मलेरियाचे १२० रुग्ण, लेप्टोचे १८, डेंग्यूचे ७८, गॅस्ट्रोचे ७७, हेपेटायसिसचे ९, चिकनगुनियाचे ० तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ६ रुग्णांची नोंद झाली होती. ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत ७ दिवसात मलेरियाचे १७७ रुग्ण, लेप्टोचे ३१, डेंग्यूचे १७८, गॅस्ट्रोचे १६१, हेपेटायसिसचे १९, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात मलेरियाचे ५७ रुग्ण, लेप्टोचे १३, डेंग्यूचे १००, गॅस्ट्रोचे ८४, हेपेटायसिसचे १०, चिकनगुनियाचे १ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ७ रुग्णांची वाढ (Patients Increases) झाली आहे.
या आधीची रुग्णसंख्या : सप्टेंबर २०२२ मध्ये मलेरियाचे ६५९ रुग्ण, लेप्टोचे ४७, डेंग्यूचे २१५, गॅस्ट्रोचे ३७१, हेपेटायसिसचे ६९, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १४ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये मलेरियाचे ५७६ रुग्ण, लेप्टोचे ३१, डेंग्यूचे २५४, गॅस्ट्रोचे २४७, हेपेटायसिसचे ४१, चिकनगुनियाचे ३३ तर एच १ एन १ च्या ८ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे १ रुग्णाचा मृत्यू झाला होता.
या आजारामुळे झाले मृत्यू : २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यू मुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू (Death Rate) झाला आहे.
स्वाईन फ्लू ची अशी घ्या काळजी : मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिंकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, ओठ निळे पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे, अन्यथा त्यांचा मृत्यू होऊ शकतो असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
डेंग्यू, मलेरियाची अशी घ्या काळजी : डेंग्यू, मलेरिया आदी आजार हे मच्छर आणि डासांमुळे होतात. यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणी वापरावी. मलेरिया डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घ्यावी. ताप, उलटी, जुलाब होत असल्यास पालिकेच्या हेल्थ पोस्ट, दवाखाने व रुग्णालये येथे मोफत तपासणी केली जाते. या ठिकाणी जाऊन नागरिकांनी उपचार करून घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी, आजारांकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.