मुंबई - मुंबई विद्यापीठाचे अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमन यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ अपलोड करून त्यांची मोठी बदनाम केली. त्याचे पडसाद मंगळवारी मुंबई विद्यापीठात उमटले. गांधी घराण्याची बदनामी सोमन यांच्याकडून करण्यात आली असल्याचा आरोप करत एनएसयुआयच्यावतीने कुलगुरू यांच्या कार्यालयाला घेराव घालत टाळे ठोकले. त्यामुळे, विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
माझे नाव राहुल सावरकर नसून माझे नाव राहूल गांधी असल्याचे सांगत मी माफी मागणार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी एका सभेमध्ये केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमन यांनी फेसबुक आणि ट्टिटरवर स्वत:चा एक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो अपलोड केला होता. यात सोमन म्हणाले की, सावरकर होण्यासाठी मोठे त्याग करावे लागते आणि तुझ्यात एकही गुण नसल्याची टीका सोमन यांनी राहुल गांधी यांच्यावर केली होती. त्यामुळे, सोमन यांच्या या व्हिडिओमुळे मुंबई विद्यापीठाचे नाव बदनाम झाल्याचा दावा एनएसयुआयकडून करत कुलगुरुंच्या दालना समोरच गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे सोमन एका जबाबदार पदावर असून त्यांच्या या वक्तव्यामुळे गांधी घराण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये राग निर्माण होणार असल्याचा दावा देखील करण्यात आला. त्यामुळे, सोमन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एनएसयुआयच्यावतीने मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी सोमन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एनएसयुआयच्या शिष्टमंडळाला ठरावीक आश्वासन मिळाल्यानंतर कुलगुरुंच्या कार्यालयाचे दरवाजे उघडण्यात आले.