मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना मृत्यूचा आकडाही फुगत चालला आहे. देशाचा मृत्यूदर 3.23 टक्के असताना राज्यातील मृत्यूदर मात्र 4.67 टक्के इतका आहे. तेव्हा राज्याच्या टास्क फोर्ससाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आता मृत्यूदर कमी करणे, हेच मुख्य लक्ष्य असल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.
ऑक्सिजनचा मुबलक साठा, नवीन औषधांचा योग्य वापर आणि प्लाझ्मा थेरपी या त्रिसूत्रीचा वापर करत येत्या काही दिवसांत मृत्यूदर 1 टक्के आणि त्यानंतर 0 टक्के करणे हे ध्येय असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 32 हजारांच्या घरात गेला आहे. तर आत्तापर्यंत 6 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 3 हजार 671 मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईतील वाढत्या मृत्यूने चिंता वाढवली असतानाच आठवड्याभरात ठाणे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर आदी जिल्ह्यातील मृत्यूमध्येही मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या मृत्यूमुळे राज्याचा मृत्यूदर 4.67 टक्के झाला आहे. देशाच्या मृत्यूदरापेक्षा हा दर अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे हे आवाहन आहे. पण त्याचवेळी आता मृत्यूदर कमी करत तो 1 टक्क्यांनी आणि त्यानंतर 0 टक्के करणे यासाठी आता आम्ही विशेष प्रयत्न सुरू केल्याचेही डॉ जोशी म्हणाले.
मे मध्ये राज्यातील मृत्यूदर 3.25 ते 3. 37 दरम्यान होता. पण जूनमध्ये मात्र हा दर वाढत 4.67 टक्क्यांवर गेला आहे. पण आता मात्र नवीन औषध-इंजेक्शन आली असून, त्याचा योग्य वापर केला जाणार आहे. तर ऑक्सिजनचा अपुरा साठा हेही मृत्यूचे एक कारण आहे. रुग्णाला वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्याने मृत्यू होत असल्याच्या तक्रारी आहेत. तेव्हा ऑक्सिजनचा साठा वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी प्लाझ्मा थेरपी अनेक रुग्णांवर यशस्वी ठरत आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीचा वापर आता वाढवण्यात आला आहे. त्यासाठीच राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असेही डॉ जोशी म्हणाले.
प्लाझ्मा थेरपी, ऑक्सिजनची उपलब्धता आणि नवीन औषधांचा वापर या त्रिसूत्रीचा वापर आता केला जाणार आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्ण दुपटीचा वेग मंदावला आहे. पण याचा अर्थ धोका संपलेला आहे असा नाही. मुंबईतील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी आणखी दीड ते दोन महिन्याचा काळ लागेल असेही, डॉ जोशी यांनी सांगितले.