मुंबई - एमपीएससीमार्फत अराजपत्रित पदांची भरती घ्या, अशी मागणी आप युवा आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील अराजपत्रित पदांची (वर्ग 1 ते 4) भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे घेणे आवश्यक आहे. याबाबतचे निवेदन सर्व जिल्ह्यातील युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्सम जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्याकडे दिल्याचे आप युवा आघाडीने सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने "महापोर्टल बंद" करुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली. आता पुन्हा अशाच कोणत्या खासगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या नवीन पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया न करता, एमपीएससीद्वारेच ही भरती प्रक्रिया व्हावी, याकडे लक्ष वेधण्यात आले.
महापोर्टलमध्ये असणाऱ्या गोंधळामुळे ही प्रक्रिया बंद व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर हे पोर्टल बंद केले. मात्र, राज्यातील आता अराजपत्रित पदांसाठी हे महाविकास आघाडीचे सरकारदेखील नवीन खासगी एजन्सीला काम देऊन संबंधित भरती प्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे. याला सर्व विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आप युवा आघाडीदेखील या विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभी आहे. आमचादेखील खासगी एजन्सीला विरोध आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे आप युवा आघाडीचे प्रवक्ते उत्तम पाटील यांनी सांगितले.