मुंबई - सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसामुळे शीव स्थानक परिसरातील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
पावसामुळे या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या धीम्या गतीच्या कोणत्याही गाड्या सुरू झाल्या नसून, पाणी ओसरेपर्यंत या रेल्वे स्थानकावर एकही गाडी धावली जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान सकाळपासून या स्थानकावर अनेक प्रवासी खोळंबले आहेत. काही वेळानंतर पाऊस ओसरेल आणि रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येईल या आशेने प्रवासी या स्थानकावर बसले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर दुसरीकडे सायन स्थानकात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.