मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे २ हजारांहुन अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, हे रुग्ण चाचण्या वाढवल्याने समोर येत आहेत असे सांगत मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. तसेच, जीम आणि रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांना परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. सीआयआयकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गुरुवारी मुंबईत २ हजार १६३ नव्या कोरोना रुग्णांची तर ५४ मृत्यूंची नोंद झाली आहे. याबाबत बोलताना चहल म्हणाले, शहरात कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मुंबईत आधी ७ हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या केल्या जात असल्याचे चहल म्हणाले. महापालिकेने जाणीवपूर्वक चाचण्या दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते, याची खात्री होती. याआधी दिवसाला ७ हजार चाचण्यांमागे १ हजार १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २ हजार इतकी झाली आहे, असे चहल म्हणाले.
महापालिका दिवसाला २० हजार चाचण्या करण्याची योजना आखत आहे. चाचण्यांची संख्या दिवसाला ३२ हजार इतकी केली तर यामुळे एका दिवसाची रुग्णसंख्या ४ हजारांपर्यंत जाईल. आपली आरोग्य यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला. तर, पालिकेचे आरोग्य कर्मचारी मोठ्या धैर्याने कोविड-१९ चा सामना करत असून त्यांनी किल्ला लढवत ठेवला आहे. मात्र, दुसरीकडे अजूनही नागरिक विना मास्कचे शहरात फिरत असल्याचे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. आता कोरोनाला आळा घालायचा असेल तर नागरिकांनीसुद्धा सर्व बाबींची दक्षता घेतली पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्व जबाबदारी नागरिकांवर टाकली.
हेही वाचा - धारावीकरांसाठी 672 घरे तयार, जानेवारीत डीआरपीकडे होणार हस्तांतरीत