मुंबई- शहरात कोरोनाची लागन झालेला एकही नवीन रुग्ण नाही, अशी माहिती शहर उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. त्याचबरोबर, खोकताना शिंकताना रुमाल वापरावा, मास्क वापरण्याची गरज नाही, असे आवाहन देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोनाच्या रुग्णांबाबत माहिती तसेच कोरोना बाधितांच्या उपचारासाठी शहरातील रुग्णालयांमध्ये केलेली व्यवस्था, याबद्दल सांगण्यासाठी शहर महानगर पालिकेने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सदर माहिती दिली.
१८ जानेवारी पासून मुंबई विमानतळावर आतापर्यंत १ लाख ९६ हजार ७६२ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामधील १९० लोकांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून त्यातील फक्त २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उरलेल्या १८८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या रक्त चाचण्या देखील निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही रुग्णांनी घरामध्ये राहून काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर, कोरोनाचा विस्तार लक्षात घेता कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २८ बेडची सुविधा होती. त्यात वाढ करून ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संख्या शंभरावर वाढविली जाईल आणि इतर रुग्णालयातही आयसोलेशन वॉर्ड उभारले जातील, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचबरोबर, सेव्हन हिल्समध्ये ४०० बेडचे क्वारंटाईन कक्ष तयार केला जात असून कोरोनाबाबत काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचणी आल्यास १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावे. नागरिकांनी खोकताना शिंकताना रुमाल वापरावा, मास्क वापरण्याची गरज नाही. कोरोना झाला आहे, अशा लोकांच्या सानिध्यात आलेल्या लोकांनाच कोरोना होण्याची शक्यता आहे. यामुळे इतर नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन देखील आरोग्य अधिकाऱ्यांनी केले.
हेही वाचा- ..तरच कस्तुरबा रुग्णालयात प्रवेश करा, प्रशासनाकडूनच वाढवली जातेय भीती