मुंबई Nitesh Rane On Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरपारची भूमिका घेतलेली असताना, आज मुंबईत अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला. तर हा हल्ला करणारे लोक काल मातोश्रीवर होते. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हा हल्ला केला आहे. असा थेट आरोप भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तोडफोड करताना कॅमेरे कसे : नितेश राणे म्हणाले की, आज गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीवर ज्यांनी हल्ला केला आहे, ती मुले काल मातोश्रीवर होती. हा हल्ला करून जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा कट मातोश्रीवर रचला गेला. जेव्हा गाडी फोडण्यात आली त्या प्रसंगी तिथे कॅमेरे कसे उपलब्ध होते? हा सर्व पूर्वनियोजित कट होता. आतापर्यंत मराठा समाजाचे ५८ मोर्चे झाले पण ते सर्व शांततेत झाले. परंतु २४ तारखेनंतर राज्यात दंगली होणार हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सांगत आहेत. हा पूर्णपणे मराठा समाजाला बदनाम करण्याचा डाव आहे. हे संपूर्ण कारस्थान मातोश्रीच्या आशीर्वादानं होत असून या प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्यात सर्वांसमोर शपथ घेतली आहे. त्या शपथेवर तरी मराठा समाजाच्या लोकांनी विश्वास ठेवावा, असं राणे म्हणाले.
अबू आझमींना अटक करा : मुंबईमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी मुस्लिम बोर्ड तसंच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे समाजवादी पक्षाशी जवळीक साधत असताना अशा पद्धतीने हमास व दहशतवाद्यांच्या समर्थनामध्ये मुंबईत रॅली निघत असेल तर यावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? या मुद्द्यावर अबू आझमी यांना अटक करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आता पीएम केअर फंडाच्या चौकशीची मागणी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी ही चौकशी का केली नाही? तसंच जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कुठल्याही उद्योगाच्या विरोधात आंदोलन करतात त्यानंतर ते आंदोलन मिटवण्यासाठी किती खोके मोजले जातात? याचीही चौकशी व्हायला हवी, असंही राणे म्हणाले आहेत.
निलेश राणे यांचा विषय संपला : नितेश राणे यांचे मोठे बंधू, माजी खासदार, निलेश राणे यांनी राजकारणातून संन्यास घेण्याच्या भूमिकेवर यूटर्न घेतला आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आमच्यासाठी आता हा विषय संपला आहे. काल निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं समाधान झालं आहे. आता पुन्हा ते कामाला लागले असून आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे.
हेही वाचा -
- Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ
- Satish Maneshinde : मराठा आरक्षण आंदोलकांचा खटला मोफत लढवणार; अॅड सतीश मानेशिंदे यांची माहिती
- Gunaratna Sadavarte News : स्वतःची कार जाळणाऱ्या 'त्या' मराठा कार्यकर्त्यानं फोडली सदावर्तेंची कार