मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) तपास करत आहे. या संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील निलंबित अधिकारी सचिन वाझेंना अटक झाली आहे. याच प्रकरणात एनआयए आता विक्रोळी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करत आहे.
कोणालाही क्लीनचीट नाही -
17 फेब्रुवारीला मनसुख हिरेनने स्कॉर्पिओ गाडी विक्रोळी महामार्गावर बंद पडल्यामुळे गाडी त्याच ठिकाणी ठेवून टॅक्सीने मुंबईच्या दिशेने प्रवास केला होता. दुसऱ्या दिवशी 18 फेब्रुवारीला ही स्कॉर्पिओ गाडी चोरी झाल्याचे सांगत त्याने विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल करून घेण्यासाठी विक्रोळी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांना सचिन वाझेने स्वतः फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे विक्रोळी पोलीस ठाण्यामधील काही अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. 18 फेब्रुवारीला हिरेनने ज्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. यामध्ये कोणालाही क्लीनचीट दिली नसल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस खात्याकडूनही अंतर्गत चौकशी सुरू -
सचिन वाझे या अधिकाऱ्याकडून विक्रोळी पोलीस ठाण्यामधील काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता का? याची चौकशी मुंबई पोलीस खात्याकडून केली जात आहे. यासाठी एक अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याकडून त्यांचा जबाब घेतला जात आहे.