मुंबई : New Hit and Run law देशभरात ट्रक चालकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारलं. 'हिट अँड रन' कायद्यात केंद्र सरकारनं काही कठोर तरतुदी केल्या आहेत. त्या विरोधात सर्वत्र ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट आहे. या कायद्या विरोधात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांत आंदोलन सुरू आहे. या आंदोलन आधी शांततेत सुरु होतं. मात्र, चालक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर याला हिंसक वळण लागलं. तर दुसरीकडे या आंदोलनामुळं दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली.
पोलिसांवर हल्ला : नवी मुंबईतील उलवे परिसरातील बेलापूर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी यातील बहुतांश चालक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. याचवेळी काही ट्रक चालकांनी थेट पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली. तसेच, बेलापूर महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत अनेक ट्रक चालकांना ताब्यात घेतलं. तसेच, या दरम्यान, पनवेल-सायन महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पहिल्या तरतुदी काय होत्या : अपघात झाल्यानंतर वाहनचालकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (कलम 279) प्रमाणे निष्काळजीपणे वाहन चालवणं, (304 अ) म्हणजेच निष्काळजीपणामुळं मृत्यू आणि 338 नुसार जीव धोक्यात घालणं या कलमांखाली गुन्हा दाखल केला जात होता. मात्र, नवीन कायद्यात घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालकावर कलम (104(2))अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जर त्यानं पोलिसांना किंवा दंडाधिकार्यांना माहिती दिली नाही, तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडही भरावा लागणार आहे.
काय आहे नवा कायदा? : 'हिट अँड रन' प्रकरणातील नव्या कायद्यानुसार, घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा आणि तब्बल 7 लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलीये. यातील नवीन बदल हे जाचक तरतुदी आहेत असं म्हणत सर्वत्र ट्रक चालक आक्रमक झालेत. आधीच्या कायद्यानुसार, 'हिट अँड रन'मध्ये चालकाला पोलीस ठाण्यातून जामीन मिळत असे. तसेच, गुन्हा सिद्ध झाल्यास दोषीला केवळ दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती. मात्र, आता ही पद्धत नवील तरतुदींमधून वगळण्यात आलीय. 'हिट अँड रन'बाबत केंद्र सरकारनं नवे कायदे केले असून, त्याअंतर्गत ट्रक किंवा डंपर चालकाकडून अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला आणि तेथून पळून गेल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच, 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. तसेच, नवीन कायदा लागू झाल्यानंतर संबंधिताला आता दहा वर्षे तुरुंगात राहावं लागणार आहे. मात्र, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्याची तरतूद आहे. या सगळ्या बदलानंतर देशभरात ट्रक आणि डंपर चालक या कायद्याला विरोध करत आहेत.
हेही वाचा :