मुंबई - चिपळूणमधील तिवरे धरण दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. त्यामुळे अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर हे सरकार जागे होणार आहे ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील तिवरे हे धरण फुटून ११ जणांचे बळी गेले आहेत. या दुर्घटनेवर बोलताना जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाटील म्हणाले, तिवरे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही या धरणाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी धरण फुटुन येथील काही गावं पाण्याखाली गेली. तर अनेक लोकं बेपत्ता झाली आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास फुटले असून जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ११ मृतदेह हाती लागले आहेत. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये अनेकांची जनावरे देखील वाहून गेली असून कित्येकांचा संसार उघड्यावर आला आहे. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावर आज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.