मुंबई - राज्य सरकारने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या ताब्यात असलेल्या तब्बल 34 साखर कारखान्यांना नुकतीच हजारो कोटींची थकहमी दिली आहे. यामुळे लवकरच राज्यातील कारखान्यांमध्ये गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार येत नसल्याने याविषयी तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राज्यातील साखर कारखानदारांकडून करण्यात आली. मुंबईतील साखर भवन येथे असलेल्या महराष्ट्र राज्य सहकारी साखर संघामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील कारखानदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राज्यातील कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कारखानदारांकडून वेगवेगळ्या विषयावर व ऊस उत्पादक शेतकर्यांपासून ते कारखानदारांपर्यंत असलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली.
राज्यात मागच्या वर्षीच्या गाळप हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. यंदा ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात पीक आले असून राज्यात साखरेचा मोठा साठा निर्माण होणार असून कारखाने अडचणीत येणार आहेत. यावर काही उपाययोजना करावी, अशी विनंती यावेळी कारखानदारांनी पवारांकडे केली. कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की, लॉकडाउननंतर एफआरपी देण्यासंदर्भात साखर कारखान्यांची परिस्थिती नाही. कोरोनामुळे ऊसतोड कामगार मिळत नाहीत. यामुळे या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली. यासंदर्भात माहिती देताना संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले की, यंदा राज्यात ९०० लाख टन ऊसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. मागच्या हंगामातील ७२ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात यंदाच्या १०० लाख टन साखरेची भर पडणार आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने पुढच्या हंगामात अधिक ऊस असणार आहे.
वाढत्या साखर साठ्याची मोठी समस्या राज्यात उद्भवली आहे. यावर मार्ग काढावा, अशी मागणी आम्ही शरद पवार यांच्याकडे केली. १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू होत आहे. किमान १९५ कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. तसेच यंदा गाळप घटवण्याची गरज असून इथेनाॅल निर्मितीला अधिक चालना दिली पाहिजे, अशी विनंती पवार यांच्याकडे केल्याचे शेटे यांनी सांगितले. २ ऑक्टोबर रोजी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक होणार आहे. त्या बैठकीत साखर साठ्यावर मार्ग काढण्यासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. पवारांच्या हस्ते साखर संघात नव्याने बनवण्यात आलेल्या बँक्वेट हाॅलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित हाेते.