मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तातडीची बैठक मंगळवारी बाेलावण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीत आमदारांना सत्ता स्थापनेसाठी पक्षाच्या भूमिकेबद्दल निर्णय देणार आहेत. त्यानंतर पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची पुन्हा भेट घेणार आहेत.
शनिवारी दुपारी शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात मंगळवारी आमदारांची मुंबईत बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. शिवसेना-भाजपने मतभेद सोडून एकत्र यावे आणि सरकार स्थापन करावे, या सल्ल्याशिवाय माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही, असे पवार बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तर, सिल्वर ओक बंगल्यावर सकाळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आपल्या प्रमुख नेत्यांना सेनेच्या भूमिकेवर लक्ष ठेवून राष्ट्रवादी आपला निर्णय घेईल, असे सांगितले आहे. उद्या पवार मुंबईत असल्याने अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राम मंदिर निकालाने भाजपची स्थिती मजबूत झाली असून भाजप राज्यात मध्यावधी निवडणुका सुद्धा घेऊ शकते, अशी शंका मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेचा ‘डेड लाॅक’ संपवा, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सेना-भाजपला केले आहे. काँग्रेसमधला मोठा गट काँग्रेसने यात पडू नये याच मताचा आहे. तर, आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सेनेला पाठिंबा नव्हे तर थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा झाली आहे. त्यासाठी जयपुर येथे उद्या आमदारांचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.