मुंबई : मुंबईत महानगरपालिकेने २०२२ - २३ चा ४५ हजार कोटी रुपयांचा जंबो अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर कार्यकाळ संपल्याने पालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्त करण्यात आली आहे. यामुळे सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ( BMC budget for the financial year 2023 24 ) ३ फेब्रुवारीला पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chaha) सादर करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपा सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित तसेच शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देणारा असा हा अर्थसंकल्प असणार आहे. यंदा पालिका आणि स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने आयुक्तांचे अर्थसंकल्पावरील भाषण होणार नाही. मात्र आयुक्त अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती प्रसारमाध्यमांमधून नागरिकांना देतील.
पालिकेवर प्रशासक नियुक्त: मुंबई पालिका ही जगातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख आहे. पालिकेचे ४५ हजार कोटींचे बजेट असून ८५ हजार कोटीहून अधिक रक्कमेच्या बँकेत ठेवी आहेत. अशा या महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपली आहे. मुदत संपल्याने पालिकेवर राज्य सरकारने आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. महापालिकेला कार्यकाळ संपण्याआधी नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी तसेच मुंबईचा विकास करणारे प्रस्ताव महानगरपालिका सभागृह, स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती, स्थापत्य समिती शहर, स्थापत्य समिती उपनगर, सार्वजनिक आरोग्य समिती, बाजार व उद्यान समिती, विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती यांच्या मार्फत मंजूर केले जायचे. मात्र पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
यावेळी असा होईल अर्थसंकल्प सादर: मुंबई महापालिका आयुक्त स्थायी समितीमध्ये अध्यक्षांकडे दरवर्षी अर्थसंकल्प सादर करतात. अर्थसंकल्पावर पालिका आयुक्त यांचे भाषण होते. त्यानंतर आयुक्त पालिका प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पात करदात्या मुंबईकर नागरिकांना काय मिळाले, कोणता कर वाढला, कोणते शुल्क वाढले, कोणत्या नवीन योजना आणल्या याची माहिती देतात. मात्र यंदा पालिका अस्तित्वात नसल्याने आयुक्त अर्थसंकल्पावर भाषण करणार नाहीत. थेट प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतील. तसेच स्थायी समिती आणि पालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने थेट त्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु करतील
पालिकेवर प्रशासक: मुंबई महापालिकेवर एप्रिल १९८४ मध्ये द.म.सुखटणकर यांना पहिल्यांदा प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपल्याने डॉ. इकबाल सिंग चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प : मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विष्णूचा प्रसार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सन २०२२ - २३ चा ४५९४९.२१ कोटी रुपयांचा जंबो अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. ८.४३ कोटी शिलकीचा हा अर्थसंकल्प होता. २०२१ - २२ चा ३९०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. २०२२ - २३ चा अर्थसंकल्प २०२१ - २२ या वर्षापेक्षा १७.७० टक्के मोठा आहे.
२०२२ - २३ मधील विशेष तरतुदी: रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प - ८९७३.८७ कोटी, घन कचरा व्यवस्थापन - ४९८२.८३ कोटी, आरोग्य - ६९३३.७५ कोटी, पर्जन्य जलवाहिन्या - २१३२.७६ कोटी, प्राथमिक शिक्षण - ३३७०.२४ कोटीची तरतूद होती.