मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकातील घाणेरड्या सरबत प्रकरणानंतर मुंबई महापालिकेने शहरातल्या शितपेयांची चाचणी घेतली. या मोहिमेत ५९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुन्यातील तब्बल ८७ टक्के सरबतातील बर्फाच्या गोळ्यांमध्ये दूषित घटक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी रस्त्यावरील थंडपेय आणि बर्फाते सेवन करत असताना सावधानता घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सध्या रणरणत्या उन्हात घामाने हैराण होणारे मुंबईकर बर्फाचा गोळा आणि थंडगार सरबताचा आस्वाद घेत आहेत. मात्र, रस्त्यावरील बर्फ व सरबत पिण्यास योग्य नसल्याचे आढळले आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकात घाणेरड्या पध्दतीने सरबत बनवतानाचा प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वे स्थानकातील सरबतांची स्टॅाल्स बंद करण्यात आली आहेत. या प्रकरणानंतर मुंबई भरातल्या रस्त्यावरील सरबत, थंडपेयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तपासणी मोहिम राबवली होती. मुंबईचा पारा सध्या ३३ अंशांवर गेला आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्याने मुंबईकर घामाने चिंब होत आहेत. या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी मुंबईकर सध्या मिळेल त्या ठिकाणची थंड पेये पित आहेत. मात्र ही पेये पिण्यास योग्य नाही. मुंबईकरांनी रस्त्यावरील घातक थंडपेये पिऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
घेण्यात आलेल्या ५९६ नमुन्यांपैकी दुषित पेये पुढीलप्रमाणे -
बर्फाच्या १५६ नमुन्यांपैकी १४१ नमुने पिण्यास अयोग्य
लिंबू सरबताच्या २०४ नमुन्यांपैकी १५७ नमुने पिण्यास अयोग्य
उसाचा रसाच्या २३६ नमुन्यांपैकी २२१ नमुने पिण्यास अयोग्य