मुंबई- देशभरात १ सप्टेंबरपासून जेईई आणि नीट या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही जोरात असल्याने या परीक्षेसाठी विविध प्रकारची वाहतूक सेवा उपलब्ध होणे कठीण होणार आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांपुढे परीक्षेला कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आयआयटी मुंबईचे आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रवासाच्या अडचणी आहेत, त्यांना सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
देशातील कोणत्याही भागात असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राजवळ पोहोचण्यासाठी प्रवासाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी संकेतस्थळ सुरू करुन त्यावर नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांना त्यांची सर्व माहिती, पिन कोडसह भरावी लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी देण्यात आलेले प्रवेशपत्र याचीही माहिती भरावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या स्वंयसेवकांनाही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे.
हेही वाचा- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरू समितीची बैठक संपली, उद्या सरकारला सादर करणार अहवाल
जेईई आणि नीट या परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी देशभरातून केली जात असतानाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आणि केंद्र सरकारनेही अद्याप कोणताही दिलासा दिला नाही. यामुळे १ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या या परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यावर पर्याय शोधला आहे. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचण असणाऱ्यांसाठी https://www.eduride.in/ नावाने एक संकेतस्थळ सुरू केले आहे.
देशभरातील जे विद्यार्थी जेईई-नीट परीक्षा देणार आहेत, त्यांच्याशी अधिकाधिक संपर्क व्हावा, यासाठी अनेक आजी-माजी विद्यार्थी समोर आले असून यासाठी फेसबूक, इन्स्टाग्राम, आदी समाज माध्यमांवर मोहीम सुरु केल्याची माहिती आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून देण्यात आली.