मुंबई - मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचे वचन मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. मात्र, मुंबईला सध्या जो पाणी पुरवठा केला जातो त्यामधून 24 तास पाणी देणे शक्य नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची संख्या वाढवल्यानंतर पाणीसाठा वाढले त्यानंतर 24 तास पाणी देणे शक्य होऊ शकते, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे नवे प्रकल्प मार्गी लागेपर्यंत मुंबईकरांना 24 तास पाण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
मुंबईला सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमधून दिवसाला 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणी मुंबईला आणले जाते. धरणामध्ये 14 लाख 37 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असल्यास वर्षभर नागरिकांना पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. वांद्रे आणि मुलुंड या दोन विभागात 24 तास पाणी देण्याचा पायलट प्रकल्प पालिकेने सुरु केला होता. गेल्या काही वर्षात 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या विभागात वाढ झालेली नाही. 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या विभागात नव्या वर्षात वाढ होणार का यावर पालिका प्रशासनाने सध्या तरी अशी वाढ करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - 'सरकारला #CAA आणि #NRC रद्द करण्यास भाग पाडू'
मुंबईला सध्या 7 धरणांमधून 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. सध्या दोनच विभागात 24 तास पाणीपुरवठा केला जातो. यात आणखी काही विभाग वाढवायचे असल्यास इतर ठिकाणचे पाणी कमी करावे लागेल. इतर विभागातील पाणी कमी केल्यास त्या विभागातील नागरिकांकडून ओरड होऊ शकते. यामुळे पाणीसाठ्यात वाढ करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी नवे पाणी प्रकल्प लवकर मार्गी लावावे लागतील. नवीन पाणी प्रकल्प पुढील काही वर्षांत पूर्ण होणार नसल्याने मुंबईकरांना 24 तास पाण्यासाठी आणखी वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा - शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या घरावर भाजपचा मोर्चा