मुंबई Mumbai Sessions Court News : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात इस्लाम जिमखाना आणि पारशी जिमखाना यांच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. तिकीट वाटपांच्या संदर्भात नुकसान भरपाईची मागणी त्यात केली होती. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं या संदर्भात दोन्ही जिमखाना वतीनं दाखल झालेल्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
याचिका फेटाळल्या : वानखेडे स्टेडियमवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांसाठी 606 ऐवजी 454 तिकिटांचं वाटप केलं गेलं होतं. हे वाटप मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) करण्यात आलं होतं. मात्र एमसीएनं केलेले वाटप बेकायदेशीर आणि मनमानी आहे. त्यामुळंच त्याविरोधात पारशी जिमखाना विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि इस्लाम जिमखाना विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन अशा दोन स्वतंत्र याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या होत्या. मात्र त्यांची मागणी ही नियमानुसार नसल्याचं सांगत सत्र न्यायालयानं त्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.
वादाचं कारण काय : मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत 1968 सालापासून भाडेपट्टी संदर्भातील पारशी जिमखाना आणि इस्लाम जिमखाना यांच्यात करार झाला होता. त्या कराराचं नुतनीकरणही करण्यात आलेलं होतं. तेव्हा प्रत्येक कसोटी सामन्यासाठी प्रत्येकी 1,424 तिकिटांच्या जागा आरक्षित करुन दिल्या जातील, असं मुंबई क्रिकेट असोसिएशन सोबत करारात मान्य केल्याचं म्हटलंय. तसंच 2010 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशननं वेगवेगळ्या आसन क्षमतेचे नवीन स्टेडियम बांधले. तिथंही 946 तिकिटांच्या जागावाटप करण्यात येतील असं निश्चित झालं. 2011 मध्ये विश्वचषक क्रिकेट सामन्यांसाठी केवळ 606 तिकिटांचं वाटप निश्चित केलं होतं. हे नियमानुसार नाही, ही आमची फसवणूक आहे, असा याचिकेत दावा करण्यात आले. त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशी मूळ मागणी दोन्ही जिमखान्याकडून केली होती.
एमसीएचा दावा काय : मुंबई क्रिकेट असोसिएशनचा दावा होता की, आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट सामने हे बीसीसीआय आणि आयसीसी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित होतात. बीसीसीआय या क्रिकेटच्या सामन्यांचे नियोजन करणारी एक सर्वोच्च संस्था आहे. त्याच्यामुळं त्याचे नियमदेखील मुंबई क्रिकेट असोसिएशनला ऐकावे लागतात. त्यामुळं त्यांच्या कराराचा भाग म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशननं नियमानुसारच तिकीट वाटप केलेलं आहे. त्यामुळं तिकीट वाटपाच्या संदर्भात जिमखान्यानांना अधिकार नाही, असाही दावा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलाय. तसंच यासंदर्भात वकील विनोद सातपुते यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, बीसीसीआय ही सर्वोच्च क्रिकेटची संस्था आहे. त्यांचे नियम मुंबई क्रिकेट असोसिएशनलादेखील पाळावेच लागतात.
हेही वाचा :
- Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारला जाणार सचिनचा भव्य पुतळा! जाणून घ्या कधी होणार उद्घाटन
- World Cup २०२३ : विश्वचषक क्रिकेट सामन्यांसाठी वानखेडे मैदान सज्ज, प्रेक्षकांची गर्दी घडवणार इतिहास?
- Wankhede Stadium Security : 'एनआयए'ला मेल, नरेंद्र मोदी स्टेडियम उडवण्याची धमकी; 'वानखेडे'ची सुरक्षा वाढवली