मुंबई - खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेचे भव्य लाँचिंग येथे नुकतेच पार पडले. या मालिकेद्वारे जिजाऊ आई साहेबांची जीवनगाथा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांसमोर जिवंत होणार आहे.
बालपणी जाधव कुटूंबात सगळ्यात लाडकी असलेली जिजा, स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊ आईसाहेब या पदापर्यंत कशा पोहोचल्या ?, नक्की अशी कोणती शिकवण त्यांनी शिवाजी महाराजांना दिली की ज्यामुळे त्यांच्या रूपाने स्वराज्य प्रत्यक्षात येण्याचे स्वप्न साकार झाले ? ते या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या गरजेनुसार भव्य दिव्य सेट्सचा वापर करण्यात येणार आहे. तर मुंबईतील गोरेगाव चित्रनगरी आणि भोर येथील राजवाड्यामध्ये या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येईल. जिजाऊ माता यांचे आभाळभर असलेले कार्य प्रेक्षकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे करणार असल्याचे, निर्माता डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.
सोनी मराठी वाहिनीला येत्या 19 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. आणि हेच निमित्त साधून ही भव्य दिव्य ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचे सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भालवणकर यांनी ई टीव्ही भारताशी बोलताना सांगितले.
विवेक देशपांडे हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. तर अभिनेत्री अमृता पवार ही या मालिकेत आपल्याला जिजाऊ आईसाहेबांच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसेल. या मालिकेचे शिर्षकगीत मंदार चोळकर याने लिहिले आहे. तसेच संगीतकार सत्यजित रानडे यांनी संगीत दिले आहे.