मुंबई - देशातील पहिली मोनोरेल म्हणून ओळख असलेले मुंबईची मोनोरेल सात महिन्यांनी आज पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेसात वाजता पहिली मोनोरेल चेंबूर ते किंग सर्कल या मार्गावर धावली. सात महिन्यांनंतर सुरू झालेल्या मोनोरेलचे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अद्यार मुभा नाही. मात्र, मोनोरेलमधून सर्वच प्रवाशांना परवानगी मिळाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून मुंबईत मोनोरेल सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज मोनोरेल प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेत प्रवासी सेवा सुरू करण्यात आली. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठीची यंत्रणा राबवण्यात आली आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी मोनोरेल प्रशासनाकडून ठिकठिकाणी सॅनिटायझर आणि इतर रसायनांचा वापरकरून स्वच्छताही राखली जात आहे.
आज मोनोरेल सुरू झाली याचा प्रवाशांसोबत आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे. आमचे सर्व कर्मचारी मोनोरेल सुरू होत असल्याने कालपासूनच कामाला लागले आहेत. सर्व प्रवाशांना अधिकाधिक चांगला प्रवास करता यावा यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. सर्व प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने आज सुरुवातीपासूनच प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती मोनोरेलचे वरिष्ठ अधिकारी रोहन साळुंखे यांनी दिली.
आज सकाळी चेंबूर ते किंग सर्कल या 19 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या स्थानकांवरून मोनोरेल धावली. चेंबूर मोनोरेल स्थानकावर आज फार गर्दी नसली तरी भक्ती पार्क, वडाळा डेपो, जिटीबी नगर आदी ठिकाणी मात्र, प्रवासी जास्त होते. सकाळच्या सत्रात मोनोरेलला प्रवाशांचा फार मोठा प्रतिसाद नव्हता. परंतु दुपारनंतर प्रवाशांची गर्दी वाढेल, असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला.