मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मे अखेरपर्यंत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅन तयार करावा, असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
शहर महापालिकेतील सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक काल पालिका मुख्यालयात पार पडली. या वेळी बैठकीच्या अध्यक्षा महापौर किशोरी पेडणेकर यांनी अॅक्शन प्लॅन बरोबरच खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी खाजगी रुग्णालयांना आवाहन करूनही प्रतिसाद दिला जात नसल्याने या रुग्णालयांवर करडी नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांनी नियमांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. असंघटित कामगारांची योग्य ती काळजी घेत त्यांना जीवनावशक्य वस्तूंचा पुरवठा वेळोवेळी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
खासगी रुग्णालयासाठी नोडल अधिकारी
मुंबईत कोरोना रुगांची संख्या वाढत असून पुढे हा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. पालिका आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. परंतू, पालिकेच्या नियमानुसार खाजगी रुग्णालयात २० टक्के खाटा आरक्षित ठेवणे बंधनकारक असले, तरी रुग्ण असल्याने खाटा रिकाम्या नसल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात येते. त्यामुळे, रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने पालिकेतील एका अधिकाऱ्याची नोडेल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही खाजगी रुग्णालये पालिकेकडून आवाहन करूनही प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा खाजगी रुग्णालयांवर अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच, अशा रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे महापौरांनी सांगितले.
मृतदेहांची विल्हेवाट लवकरच लावा
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाणही वाढत आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक मृतदेह लवकर ताब्यात घेत नाहीत. त्यामुळे, वॉर्डमध्ये, शवगृहात मृतदेह पडून राहतात. मृतदेह या ठिकाणी अधिक काळ ठेवणे शक्य नाही, त्यामुळे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येत नसल्यास त्या मृतदेहांची विल्हेवाट पालिकेने लावावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती ७५ टक्के
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना पालिका कामगारच कोरोनाग्रस्त होत आहेत. पालिका मुख्यालयातील कामगारांसह अन्य विभागस्तरावर काम करणाऱ्या कामगारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पालिका कामगारांच्या १०० टक्के उपस्थितीचा निर्णय रद्द करून ७५ टक्के करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
पावसाळापूर्व कामांचा आढावा
पावसाचे आगमन कधीही होऊ शकते, यामुळे मुंबईकरांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी लॉकडाऊनच्या काळातही कामे सुरू केली आहेत. नालेसफाई, रस्त्यांची कामे, पुलांची कामे प्रगतीपथावर असून बहुतांश कामे पावसाळा पूर्वी पूर्ण होतील, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही जाता येणार