मुंबई: मुंबईत उपनगरात विशेष करून पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असते. नागरिकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून प्रवास करत नियोजित स्थळी पोहचावे लागते. यामुळे प्रदूषणही निर्माण होते. यासाठी मुंबईत प्रदूषण न करणाऱ्या बस बेस्टने रस्त्यावर उतरल्या आहेत. तसेच नव्या दोन मेट्रो लाईन सुरू झाल्या आहेत. याचे लोकार्पण नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
अक्षय कुमार मेट्रोत : नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मेट्रोमधून प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांनी प्रवास केला आहे. अंधेरी पूर्व ते ओशिवरा स्टेशन दरम्यान त्यांनी हा प्रवास केला. अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे काही फोटो मेट्रोने ट्विट केले आहेत. मुंबईतील ट्रॅफिकमुळे अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवास केल्याचे या ट्विट मध्ये म्हटले आहे. आम्ही प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि त्यांच्या सोयीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात वचनबद्ध असल्याचे मेट्रोने म्हटले आहे.
२०१९ मध्येही असाच प्रवास: सप्टेंबर २०१९ मध्ये अक्षय कुमार यांचे शूटिंग घाटकोपर येथे सुरू होते. शूटिंग संपवून अक्षय कुमार यांना वर्सोवाला पोहोचायचे होते. परंतु गाडीने प्रवास केल्यास त्यासाठी दोन तासाहुन अधिक वेळ लागणार होता. अक्षय यांच्या दिग्दर्शकांनी मेट्रोने २० मिनिटात पोहचू असे सांगितल्यावर ,त्यांनी मेट्रोने प्रवास केला होता. या प्रवासानंतर अक्षय कुमार यांनी मेट्रोने प्रवासाचा अनुभव आणि आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता.
मेट्रो २ ए, मेट्रो ७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो - २ ए आणि मेट्रो - ७ या नव्या दोन मेट्रो लाईन या ३५ किमी मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले होते. दहिसर पूर्व ते डी.एन.नगर अंधेरी पश्चिम या मार्गावर मेट्रो २ ए आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर मेट्रो ७ या दोन मेट्रो ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
वंदे भारत ट्रेन: भारतीय बनावटीच्या वंदे भारत ट्रेनच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. मुंबई ते सोलापूर व मुंबई ते शिर्डी या दोन मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. मेल एक्सप्रेस आणि सुपर फास्ट एक्सप्रेस पेक्षा या ट्रेनची गती अधिक असल्याने प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अत्याधुनिक सुविधा वंदे भारत ट्रेनमध्ये आहे. वातानुकूलित आणि अतिवेगवान ट्रेन असल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला होता.