मुंबई - दरवर्षी पावसाळयात भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तुंबई होते. पावसाचे पाणी साचल्याने मुंबईला १४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या नुकसानीसाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आजही पाणी तुंबत असल्याने पालिका अपयशी ठरली असून मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून पालिका आणि राज्य सरकाराने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षांनी मांडले आहे. पावसाळ्यातील मुंबईचे हाल बघता पालिकेने आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे.
मुंबई जागतिक दर्जाचे शहर असून तिला देशाची आर्थिक राजधानी असेही बोलले जाते. देशातील बहुतेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये ही मुंबईमध्ये आहेत. येथून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. मात्र पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई ठप्प होत असतेस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पडते. यामुळे, २००५ ते २०१५ या १० वर्षांच्या काळात मुंबईचे १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल अमेरिकेच्या युनायटेड स्टेटस ट्रेंड अँड डेव्हलपमेंट एजन्सीने प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा - रस्त्यातील एक खड्डा बुजवण्याचा खर्च तब्बल 2 लाख 3 हजार 966 रुपये..!
मुंबईत २६ जुलै २००५ ला पावसाने हाहाकार उडवला होता. २४ तासात ९४४ मिमीहून अधिक पाऊस पडल्याने शहरात सर्वत्र पाणी साचले होते तर, हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत पाणी साचू नये म्हणून अनेक प्रकल्प हाती घेतले. त्यात मिठी नदीचे रुंदीकरण, ब्रिमस्टोव्हेड, पम्पिंग स्टेशन, पर्जन्य जलवाहिन्या मोठ्या करणे आदी प्रकल्प हाती घेतले. त्यानंतरही मुंबईत पाणी साचून ती ठप्प होत आहे.
मुंबईत किंग सर्कल, हिंदमाता, अंधेरी, वांद्रे, कुर्ला, सायन, चुनाभट्टी, मालाड, कांदिवली आदी ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतूक ठप्प होते, रेल्वे सेवाही बंद होते. मिठी नदीचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मोठा पाऊस पडल्यावर याठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. रेल्वे ट्रॅकला लागून असलेले व ट्रॅक खालून जाणारे नाले पाण्याने भरून वाहू लागल्यावर रेल्वेची लोकल सेवा ठप्प होते. यामुळे मुंबईमधील व्यापारावर परिणाम होत आहे.
हेही वाचा - पैसा आणयचा तरी कुठून? मुंबई महापालिकेच्या आर्थिक अडचणीत वाढ
या नुकसानीला पालिका जबाबदार -
मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून पाऊस पडल्यावर संपूर्ण शहर तुंबते आणि ठप्प होते. यामुळे २००५ ते २०१५ या १० वर्षात १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. ही गंभीर बाब असून २००५ ते २०१५ ची परिस्थिती आणि गेल्या ३ वर्षाची परिस्थिती पाहिल्यास मुंबई आजही तुंबत आहे. यासाठी पालिका, राज्य आणि केंद्र सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे, त्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालिकेचे अपयश, श्वेतपत्रिका काढा -
पावसामुळे झालेले नुकसान म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अपयश आहे. शहरात पाणी तुंबत असलेल्या ठिकाणांची संख्या वाढतच असून पाणी साचण्याची संख्या कमी करण्यास पालिकेला अपयश आले आहे. पाणी तुंबत असल्याने आपत्कालीन परिस्थितीचा बोजवारा उडाला आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी या सर्व परिस्थितींवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.