मुंबई - नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन डॉक्टरांच्या पुढील शिक्षणाची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी हा निर्णय दिला.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ति मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल पदवीधर आहेत. त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी तुर्तास परवानगी देता येणार नाही. या तिन्ही आरोपींवर असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परवानगी देता येईल, असे साधना जाधव यांनी निकालात सांगितले. या बरोबरच खटल्याची सुनावणी येत्या 10 महिन्यात विशेष न्यायालयाने पूर्ण करावी, असे आदेश दिले.
हेही वाचा - बॉक्सिंगपटू प्रणव राऊतची गळफास घेऊन आत्महत्या
आरोपींना पुढील शिक्षणाची परवानगी देण्यात यावी अशी आरोपींच्या वकिलांकडून शुक्रवारी मागणी करण्यात आली होती. मात्र, या संदर्भात सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विरोध दर्शवला. या तिन्ही आरोपींच्या विरोधातील साक्षीदार हे नायर रुग्णालयात काम करत आहेत. या तिन्ही आरोपींच्या विरोधात नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्येही रोष आहे. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी परवानगी दिल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे राजा ठाकरे यांनी म्हटले होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी सरकारी वकिलांची मागणी ग्राह्य धरून आरोपींचा अर्ज फेटाळला.
दरम्यान , 22 मे 2019 डॉ. पायल तडवी यांनी आरोपींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. यावेळी पायल तडवी यांनी सुसाईड नोट लिहिली होती. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी 29 मे 2019 ला डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन आरोपींना कलम 306 आणि 201 नुसार अटक केली होती.