मुंबई - मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज (6 मे) तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'कमला लाईफ सायन्स' या रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणार्या कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरण्यात येते. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कमला लाइफ सायन्स या कंपनीत रेमडेसिवीरचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीला मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भेट दिली. रेमडेसिवीरच्या उत्पादनाबाबत आढावा घेतला.
'कमला लाइफ सायन्स या कंपनीची आजच्या घडीला 30 लाख रेमडेसिवीर उत्पादनाची क्षमता आहे. या कंपनीला कच्चामाल वेळेवर उपलब्ध झाला तर उत्पादन क्षमता 50 लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते. ज्या कंपन्यांकडे क्षमता आहे, त्यांना कच्चामाल वेळेवर व जास्त प्रमाणात उपलब्ध झाला तर मोठ्या प्रमाणात औषधं तयार होऊ शकतील व लोकांचे जीवदेखील वाचतील. यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी मदत होईल', असे यावेळी पालकमंत्री असलम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, रेमडेसिवीर मिळविण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू आहे. रेमडेसिवीरचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दोन हजार रुपयांचे इंजेक्शन 20 ते 50 हजार रुपयाला काळ्या बाजाराने विकले जात आहे. याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटकही केली आहे.
हेही वाचा - 'राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू'
हेही वाचा - चेकनाक्यावर लाच मागणाऱ्यांना आवरा, पालिका आयुक्तांकडे मालवाहतूकदांराची तक्रार