मुंबई mumbai drugs news : साकीनाका पोलिसांनी कोकेन भरलेल्या कॅप्सूलसह 2 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांजवळून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 9 कोटी रुपये आहे. जप्त केलेले अमली पदार्थ नवी मुंबईतील एका व्यक्तीला द्यायचे होते, असं तपासात उघड झालेय.
कोकेन कॅप्सूल जप्त : डॅनियल नायमेक (38), जोएल अलेजांद्रो वेरा रामोस (19) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. डॅनियल हा नायजेरियन नागरिक असून जोएल हा व्हेनेझुएलाचा नागरिक आहे. साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे यांना अंधेरी पूर्व येथील साकीविहार रोडवरील हंसा इंडस्ट्रीजजवळ एक नायजेरियन व्यक्ती संशयास्पदरित्या उभा असल्याचं आढळून आलं होतं. नागरे यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडं असलेल्या बॅगेत पिवळ्या रंगाच्या कॅप्सूल आढळून आल्या आहेत. पोलिसांनी साकीनाका पोलीस ठाण्यात कॅप्सूलची तपासणी केली असता त्यात कोकेन आढळून आलं.
आफ्रिकेतून कोकेनची भारतात तस्करी : पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या कॅप्सूल जोएल अलेजांद्रो व्हेरा रामोस यानं दिल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय. या कॅप्सूल नवी मुंबईतील नायजेरियन नागरिकाला देण्यात येणार होत्या. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी जोइकाला साकीनाका येथील हॉटेलमधून ताब्यात घेऊन चौकशी केली. तो व्हेनेझुएलाचा नागरिक असून त्यानं दक्षिण आफ्रिकेतून कोकेननं भरलेल्या कॅप्सूल पोटात घालून भारतात आणल्याचं उघड झालाय.
9 कोटींचं कोकेन जप्त : पोलिसांच्या माहितीनुसार मुंबई विमानतळावरून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्यानं साकीनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. तिथं हॉटेलच्या रूममध्ये आल्यावर त्यानं कोकेननं भरलेल्या कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यानंतर त्या कॅप्सूल त्यानं डॅनियल नायमेक यांच्याकडं दिल्या. डॅनियल या कॅप्सूल नवी मुंबईतील एकाला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दोन्ही परदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत जवळपास 9 कोटी रुपये आहे.
हेही वाचा -