मुंबई - पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर जमा होणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची सुरुवात देवनार डम्पिंग ग्राऊंडपासून होणार आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या मे पासून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडवर सुमारे ३ हजार मेट्रीक टन इतक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, या प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे येथे दररोज जमा होणाऱ्या ६०० मेट्रीक टन इतक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून या प्रकल्पाच्या कामाचे आदेश येत्या १ मे पर्यंत दिले जाणार असल्याची माहिती पालिका आयक्त अजोय मेहता यांनी दिली.
मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून २४ हेक्टर जमीनीवर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या जमीनीवर भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. टाकाऊ कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया आणि पूनर्वापर करण्याच्या प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या कामाचे कार्यादेश येत्या १ जून पर्यंत दिले जातील. या प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात साडेचार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
देवनार आणि मुंलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. येथे काही समाजकंटकांकडून आगी लावत असल्याचे आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने या दोन्ही डंपिंग ग्राऊंडला संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या कामासाठी साडे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.