मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 706 रुग्णांची नोंद झाली असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बावीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 182 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 706 नवे रुग्ण आढळून आले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 25 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 18 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 59 हजार 114 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 305 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1064 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 30 हजार 602 वर गेला आहे. सध्या मुंबईत 17 हजार 645 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 182 दिवस तर सरासरी दर 0.38 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 576 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 327 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 15 लाख 45 हजार 794 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.