मुंबई - पोलीस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी १० टक्के घरे म्हाडाच्या सर्व योजनांमध्ये राखीव ठेवले जातील, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज (शुक्रवारी) येथे केली. आव्हाड यांच्या घोषणेमुळे यापुढे पोलिसांना म्हाडाच्या लॉटरीमध्ये दहा टक्के आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना 10 टक्के घरे राखीव राहणार आहेत. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी म्हाडाकडून अनेक प्रकल्पांचा आढावा घेतला.
आव्हाड पुढे म्हणाले, लवकरच म्हाडा बिल्डर म्हणून अनेक सरकारी जागावर इमारती उभ्या करेल. त्यासाठी तयारीही सुरू आहे. तसेच मुंबईतील पत्रा चाळीचा विकास करण्यासाठी आम्ही आढावा बैठकी सोबत त्यासाठी अनेक निर्णय घेत आहोत. पुढील दीड महिन्यात या पत्रा चाळीचा विकासाचा मार्ग मोकळा होईल, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक
घरे बांधताना किंवा नवीन प्रकल्प उभे करताना म्हाडाचे एक पैशाचेही नुकसान न करता विकास करणार आहे. सर्व प्रमुख बँकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी घ्यावी, अशी विनंती केली आहे. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राला बळ देण्यासाठी ही मोहीम सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यात काही आरक्षण टाकता येते का याचा विचार केला जात आहे. तसेच यामुळे राज्यातील लोकांना परवडणारी घरे देता येतील, असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - वंचितकडून आज 'महाराष्ट्र बंद'... मनमाड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
15 वर्ष अडकलेल्या शांतीसागर प्रकल्पाला चालना दिली आहे. तर घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर हा प्रकल्पाचे 15 दिवसात भूमीपूजन केले जाईल. तसेच तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद झालेल्या योजना रद्द करता येतील का याचा विचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. एसआरए प्रकल्पात आता फॉरवर्ड ट्रेडिंग यापुढे कुठेही करु देणार नाही. एक जण प्रकल्प घेतो आणि त्याचे तुकडे-तुकडे करून दुसऱ्यांना देतो. म्हणून एसआरए आणि म्हाडामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.