मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीमार्फत येत्या २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. या मागणीला मंत्रिमंडळात काही क्षणार्धातच मान्यता देण्यात आली. राज्यात एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावेत अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना कडून ही करण्यात आली होती. त्यासोबतच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षा विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्याबाबत विनंती केली होती. या मागणीला अवघ्या तासाभरातच सकारात्मक प्रतिसाद देत एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परिस्थितीचा व विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली असल्याचे सांगण्यात आले.