मुंबई - कोरोनापाठोपाठ आता मलेरिया, डेंग्यू हे पावसाळी आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. मलेरियाने आतापर्यंत दोन जण दगावले असून मलेरिया व डेंग्यूची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची विशेष मोहीम पालिकेच्या कीटकनाशक विभागाने हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत १ जानेवारी ते २४ ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत डेंग्यूची ३५,१५१, तर मलेरियाचे ८,४५६ उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या 'एडिस' डासांची ७१ लाख ५१ हजार १८० संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ३५ हजार १५१ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे तत्काळ नष्ट करण्यात आली. तसेच मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांची २ लाख ५७ हजार ९०९ संभाव्य उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. ज्यापैकी ८ हजार ४५६ ठिकाणी एनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आल्याने ती स्थळे नष्ट करण्यात आली. या व्यतिरिक्त सदर आठ महिन्यांच्याच कालावधीदरम्यान पाणी साचू शकतील, अशा तब्बल ३ लाख २३ हजार ५७९ एवढ्या छोट्या - मोठ्या वस्तू आणि ११ हजार १५३ टायर्स महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे हटविण्यात आले आहेत. यामुळे देखील डासांच्या प्रसारास आळा घालण्यास मोठी मदत झाली आहे. डास प्रतिबंधासाठी नागरिकांनी देखील आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी आणि महापालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नारिंग्रेकर यांनी केले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व व पश्चिम उपनगर भागांच्या तुलनेत शहर भागात मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहर भागातील 'ए' विभाग ते 'जी उत्तर' विभागांमध्ये म्हणजेच एकूण ९ विभागांमध्ये ६ ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कीटकनाशक विभागामार्फत एकूण ६ हजार ५०८ इमारती तपासण्यात आल्या. या तपासणी दरम्यान २० हजार ७७२ संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यानुसार तपासलेल्या या संभाव्य उत्पत्तीस्थळांमध्ये एनोफिलीस डासांची ८२९ उत्पत्तीस्थळे आढळून आल्याने ती नष्ट करण्यात आली.
महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागात कीटकनाशक विभागाच्या अतिरिक्त पथके पाठविण्यात आली होती. या पथकांद्वारे एकूण २० हजार २३२ संभाव्य उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. त्यात एनोफिलीस डासांची एकूण १५२ उत्पत्तीस्थाने आढळून आल्याने ती नष्ट करण्यात आली. तर 'इ' विभागात एकूण ४ हजार ३२६ संभाव्य उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. यामध्ये एनोफिलीस डासांची एकूण १६३ उत्पत्तीस्थाने आढळून आली, तीही नष्ट करण्यात आल्याचे नारिंग्रेकर यांनी सांगितले.