मुंबई - राज्यात बुधवारी (दि. ३० डिसें.) ३ हजार ५३७ नव्या कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १९ लाख २८ हजार ६०३ वर पोहोचला आहे. राज्यात आज (बुधवार) ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ४९ हजार ४६३ वर पोहोचला आहे. राज्यात सध्या ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर
राज्यात आज ४ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १८ लाख २४ हजार ९३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के एवढे झाले आहे. सध्या ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या निदानासाठी राज्यात १ कोटी २६ लाख ७२ हजार २५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात २ लाख ८० हजार ६८२ रुग्ण क्वारंटाईन आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे.
हेही वाचा - अनलॉकमध्ये मुंबईच्या ध्वनी प्रदूषणात वाढ
हेही वाचा - कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना डंपरने चिरडले; एक ठार, एक जखमी